महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक
Trending

नवनाथ चौंडकर परिवाराच्या वतीने “फिल्टर पाण्याची मोफत सेवा” सुरू

नवनाथ चौंडकर परिवाराच्या वतीने “फिल्टर पाण्याची मोफत सेवा” सुरू

मयुर कुदळे

जेजुरी प्रतिनिधी.

जेजुरी – सामाजिक बांधिलकी, लोकहित आणि मानवी संवेदनांचा सुंदर संगम दाखवणारा उपक्रम जेजुरीत सुरू झाला आहे. शहरातील युवा उद्योजक नवनाथ चौंडकर यांनी नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विचार करून आई कै.रंजनाबाई बबन चौंडकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ “फिल्टर पाण्याची मोफत सेवा ” या समाजोपयोगी योजनेची सुरुवात केली आहे.
जेजुरीतील विद्यानगर, दवणे मळा रोड, साईनगर, महादेवनगर, दत्तनगर आणि भानगिरे प्लॉटिंग परिसरात दिवसाआड घरोघरी जाऊन मोफत पिण्याच्या पाण्याच्या जारचे वाटप या उपक्रमांतर्गत केले जात आहे.“श्रीस्वामी समर्थ अक्वॉ” या नावाने ही सेवा सुरू करण्यात आली असून, या भागातील रहिवाशांना मोफत शुद्ध, सुरक्षित आणि थंड पिण्याचे पाणी घरपोच उपलब्ध करून देण्याचा यामागील हेतू आहे. अलीकडच्या काळात जेजुरी शहरात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कमतरता ही गंभीर समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर चौंडकर यांनी समाजातील सर्व घटकांना मदत करण्याचा निर्णय घेतला. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे आणि आरोग्य सुरक्षित राहावे, या उद्देशाने त्यांनी या सेवेची सुरुवात केली आहे.
चौंडकर यांनी सांगितले की, “ ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत ही सेवा सुरू राहील. तसेच येत्या आणि यापुढील प्रत्येक उन्हाळ्यातील एप्रिल आणि मे महिन्यांत फिल्टर केलेले थंड पाणी मोफत घरोघरी वाटप केले जाईल.”
ते म्हणाले, “उन्हाळ्याच्या प्रखर तापात अनेकांना थंड पिण्याच्या पाण्याची गैरसोय भासते. अशा वेळी नागरिकांना दिलासा देणे, हेच आमचे कर्तव्य आहे.” या जनोपयोगी उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक रहिवासी आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी चौंडकर यांचे कौतुक करत “हे काम म्हणजे खऱ्या अर्थाने जनसेवा आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
विशेषतः वृद्ध, विद्यार्थी आणि कामगार वर्गासाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरत आहे. यावेळी उद्घाटन प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष सचिन पेशवे, सचिनशेठ सोनवणे, संदीप आप्पा जगताप, अजिंक्य देशमुख, हरीभाऊ पवार, गणेश भोसले, अनिकेत हरपळे, चंद्रकांत जगताप, सागर शिंदे, वैभव झगडे, रामा दवणे, सनी झगडे, सुनील वाघ , देविदास पोंदकुले , प्रशांत सरोदे यांसह सामाजिक कार्यकर्ते आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमातून नवनाथ चौंडकर यांनी सामाजिक जबाबदारीची नवी दिशा दाखवली आहे. आजच्या काळात जिथे पिण्याच्या पाण्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत, तिथे मोफत आणि स्वच्छ पाणी नागरिकांना उपलब्ध करून देणे ही मोठी सामाजिक सेवा ठरते.“थंड पाण्याचा गारवा आणि मानवी ममतेचा उबदारपणा” — या दुहेरी अर्थाने चौंडकर यांची गारवा सेवा जेजुरीत सकारात्मक बदल घडवते आहे. त्यांच्या पुढाकारामुळे शहरात सामाजिक ऐक्य, परस्पर सहाय्य आणि माणुसकीची भावना अधिक दृढ होत आहे.
नवनाथ चौंडकर यांनी दाखवून दिले आहे की, समाजासाठी काहीतरी करायची इच्छा आणि कृतीशीलता असेल, तर मोठा बदल घडवता येतो. हा केवळ पाणीपुरवठा उपक्रम नाही, तर जनसेवेचा, माणुसकीचा आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा जिवंत संदेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button