१५ गुन्ह्यांतील फरार आरोपी अखेर जेरबंद नदीत उडी, उसाच्या फडात लपण्याचा प्रयत्न; बारामती शहर पोलिसांची धाडसी कारवाई

१५ गुन्ह्यांतील फरार आरोपी अखेर जेरबंद
नदीत उडी, उसाच्या फडात लपण्याचा प्रयत्न; बारामती शहर पोलिसांची धाडसी कारवाई
बारामती, प्रतिनिधी : तब्बल १५ गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने नॉन बेलेबल वॉरंट जारी केलेला सराईत फरार आरोपी शंकर उर्फ पोक्या प्रकाश आडके (रा. मळद, ता. बारामती) यास बारामती शहर पोलिसांनी थरारक पाठलाग करून अखेर जेरबंद केले. नदीत उडी मारून तसेच उसाच्या फडात लपून आरोपीने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांच्या शिताफीपुढे त्याचा प्रयत्न फोल ठरला.
शंकर आडके याच्याविरुद्ध बारामती शहर, बारामती तालुका आणि वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे विविध गुन्हे दाखल असून न्यायालयाने १५ प्रकरणांत त्याच्याविरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट जारी केले होते. जामीनावर सुटल्यानंतर आरोपी अनेक वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेला टाळत होता. समन्स, नोटिसा आणि वॉरंट बजावूनही तो सुनावण्यांना हजर राहत नसल्याने पोलिसांकडून त्याचा सातत्याने शोध सुरू होता.
दरम्यान, २४ मे रोजी सकाळी बारामती शहर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी आपल्या मूळ गावी दशविधी कार्यक्रमासाठी आला आहे. त्यानुसार पोलिस हवालदार टापरे, पोलीस शिपाई गिरीश नेवसे आणि पोलीस शिपाई वैभव मदने यांनी तत्काळ कारवाई करत संबंधित ठिकाणी धाव घेतली.
पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने थेट करा नदीच्या उंच भिंतीवरून नदीत उडी मारत पळ काढला. पोलिसांनीही तत्काळ त्याचा पाठलाग सुरू ठेवला. नदीतून बाहेर पडून आरोपी जवळील दाट उसाच्या फडात शिरला. उंच उसाचे पीक आणि अरुंद पायवाटांमुळे आरोपीचा शोध घेणे आव्हानात्मक ठरत होते. मात्र पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू ठेवली.
जवळपास दीड तास चाललेल्या या थरारक शोधमोहीमेनंतर उसामध्ये संशयास्पद हालचाल दिसून आली. पोलिसांनी तत्काळ परिसराला घेराव घालत आरोपीस ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.
या कारवाईत महिला पोलीस हवालदार सगुना आवटे आणि पोलीस हवालदार उमा कोकरे यांचा न्यायालयीन कागदपत्रे व वॉरंट अंमलबजावणी प्रक्रियेत मोलाचा सहभाग राहिला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बारामती शहर पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.


