जेजुरी–बारामती रस्त्यावर भीषण अपघात..चार चारचाकीची साखळी धडक..एक जण गंभीर जखमी..

जेजुरी–बारामती रस्त्यावर भीषण अपघात
चार चारचाकींची साखळी धडक, एक जण गंभीर जखमी
मयुर कुदळे
जेजुरी प्रतिनिधी
जेजुरी–बारामती रस्त्यावर जेजुरी नजीक असलेल्या किर्लोस्कर कंपनी परिसरात मंगळवारी (ता.२३) सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास भीषण असा विचित्र अपघात झाला. या अपघातात इनोव्हा, स्विफ्ट, कॅम्पर आणि एक्स्टर अशा चार चारचाकी वाहनांची एकमेकांना जोरदार साखळी धडक बसली.
या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींवर जेजुरी येथील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. जखमी झालेल्या एका व्यक्तीच्या डोक्याला तीव्र मार लागल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असून पुढील उपचारासाठी त्याला पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

अपघाताची माहिती मिळताच जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून अपघातग्रस्त वाहने बाजूला काढत रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केला. सदर अपघाताचा तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम जेजुरी पोलिसांकडून सुरू आहे.


