बारामती येथे बस स्थानकावर प्रवाशांचे चोरलेले दागिने मूळ मालकिणीला परत करण्यात यश…

एप्रिल महिन्यात परीक्षा संपून दोन महिन्याच्या उन्हाळी सुट्टीला प्रारंभ झाला असल्याने व सध्या महिलांना एसटी बस भाड्यामध्ये 50 टक्के सवलत झाल्यामुळे बहुसंख्य महिला ह्या एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करत आहेत. त्यामुळे महिलांची गर्दी दिवसेंदिवस बस मध्ये वाढलेली आहे. ह्या गर्दीचा फायदा घेऊन काही संशयित महिला या महिलांच्या दागिन्यावर हात साफ करत असतात .विशेष करून बसमध्ये चढताना एखाद्या महिलेला संशयित महिला ह्या घेरतात धक्काबुक्की मध्ये हळूचपणे गळ्यातील मंगळसूत्र किंवा चैन चोरली जाते. आणि ते इतर महिलांना कळतही नाही. मात्र अशाच पद्धतीने बारामती बस स्थानक येथे दक्ष वाहकाच्या मदतीने व प्रवाशांच्या मदतीने सोना घायाळ काळे वय 38 वर्ष राहणार चिकुर्डे तालुका वाळवा व महिलानामे सुनीता तात्या शिंदे वय 45 वर्षे राहणार मडव खडक निरगुडी तालुका फलटण दोन महिला संशयतरी त्या महिला प्रवाशांचे दागिने चोरतअसताना किंवा चोरण्याचा प्रयत्न करत असताना मिळून आल्या. या दोन महिलांना पोलीस स्टेशनला आणून त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यामध्ये साधारणपणे दीड तोळ्याचे मंगळसूत्र मिळून आलेले होते. सदरचे मंगळसूत्र कोणाचे आहे याबाबत त्यांना माहिती देता आली नाही. सदर महिलांच्यावर पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 124 प्रमाणे गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केलेली होती.. सदर महिलांनी आणखी कोणाचे दागिने चोरले असल्यास त्याबाबत बारामती शहर पोलिसांशी संपर्क करावा असे आव्हान सुद्धा करण्यात आले होते.
सदर महिलांना दोन दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आलेली होती. दरम्यानच्या काळात त्यांच्याकडे चौकशी करून व दिवसभर त्यांचा मार्गक्रमण बघून पोलिसांनी त्यांच्या ताब्यात मिळालेल्या दीड तोळा दागिन्याच्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, महिला नामे शबनम हमीद कबीर .वय 24 वर्षे राहणार फलटण हिचे मुळगाव सणसर असल्याने एसटीमध्ये प्रवास करत असताना दोन महिलांनी तिला बस मध्ये चढताना धक्का दिला. व धक्काबुक्की मध्ये पर्स मधून तिचे दीड तोळ्याचे गंठण काढून घेण्यात आले. सदरची गोष्ट तिला भवानीनगर या ठिकाणी गेल्यानंतर लक्षात आली. परंतु घरची हालाखीची परिस्थिती असल्यामुळे व बहुमूल्य असा दागिना चोरी गेल्यामुळे सदर महिला भावनिक झाली. तिला काही सुचले नाही. पोलिसांनी केलेल्या वर्तमानपत्रातील आवाहनाला प्रतिसाद देऊन सदर महिला पोलीस स्टेशनला आली. तिने तिच्या कडील पोलिसांनी जप्त केलेले दागिना ओळखला. तसेच अटक केलेल्या महिलांना सुद्धा तिने ओळखलेले आहे. याबाबत पोलिसांनी कलम 392 ची वाढ करून अधिक तपास सुरू केलेला आहे. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार आबा जगदाळे, याचा तपास करत आहेत. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय आनंद भोईटे ,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


