जेजुरी रेल्वे स्टेशन परिसरात बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण….

जेजुरी रेल्वे स्टेशन परिसरात बिबट्याचे दर्शन
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मयुर कुदळे
जेजुरी प्रतिनिधी
जेजुरी येथील रेल्वे स्टेशन परिसरात मंगळवारी सकाळी प्रथमच बिबट्याचे दर्शन झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली.
जेजुरी रेल्वे स्टेशन परिसरातील प्रख्यात किराणा व्यावसायिक राजूशेठ पानसरे यांच्या आई बिस्मिल्ला पानसरे यांना सकाळी त्यांच्या घराच्या खिडकीतून जवळील असणाऱ्या संदीप होले यांच्या शेतात बिबट्या फिरत असल्याचे दिसून आले. त्याचवेळी येथील स्थानिक रहिवाशी फ्रँकी पोप यांना देखील घराच्या मागील शेतात बिबट्या फिरत असल्याची बाब लक्षात येताच दोघांनीही घरातील सदस्यांना आणि शेजारील रहिवाश्यांना याबाबत माहिती देत सतर्क केले.
घडलेली घटना जेजुरी परिसरात वेगाने पसरली. त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक पत्रकारांनी तात्काळ ही बाब वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवली. त्यानुसार जेजुरी येथील वनविभागाचे अधिकारी वनरक्षक धनंजय देवकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शेतातील ठशांचे निरीक्षण करत संपूर्ण परिसराची पाहणी केली.शेतातील असलेले ठसे हे बिबट्याचे असल्याचे देखील यावेळी त्यांनी सांगितले.
दरम्यान, नागरिकांनी इतर कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सावध राहावे, एकटे बाहेर जाणे टाळावे तसेच वनविभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन वनरक्षक धनंजय देवकर यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुरंदर तालुक्यातील वाल्हे, आडाचीवाडी, पिंगोरी, कवडेवाडी, जेजुरी तसेच जेजुरीजवळील किर्लोस्कर कंपनी परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याच्या तसेच काही ठिकाणी बिबट्याच्या पशुधनावरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे जेजुरी व आसपासच्या गावांतील शेतकरी आणि स्थानिक नागरिकांकडून बिबट्यांचा वनविभागाने लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.


