योग,ध्यान आणि सकारात्मक विचारांची सांगड – “मेधा योगा” शिबिराची यशस्वी सांगता

योग, ध्यान आणि सकारात्मक विचारांची सांगड – “मेधा योगा” शिबिराची यशस्वी सांगता.

मयुर कुदळे
जेजुरी प्रतिनिधी
जेजुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्या मंदिर व ए.सी. हुंडेकरी ज्युनिअर कॉलेज प्रशालेमध्ये आर्ट ऑफ लिविंग संस्थेच्या माध्यमातून आयोजित तीन दिवसीय “मेधा योगा अभ्यास शिबिराची” शनिवार (ता.८) रोजी उत्साहात सांगता झाली.
या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक, शारीरिक व भावनिक विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. शिबिराचे आयोजन प्राचार्य हेमंत बगनर यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. या शिबिरात मुलांसाठी स्मरणशक्ती वाढविणे, मनोरंजनातून अभ्यासाची सवय लावणे, पालक-विद्यार्थी संवाद अधिक दृढ करणे, मनाची एकाग्रता साधणे, विचारांना सकारात्मक दिशा देणे अशा विविध अंगांवर मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी आर्ट ऑफ लिविंग संस्थेच्या अनुभवी वरिष्ठ प्रशिक्षक रेश्मा परब व तेजल कोठारी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार, प्राणायाम व विविध योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवत योग्य जीवनशैलीचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी विभाग प्रमुख नारायणकर सर यांच्या उपस्थितीत, गायकवाड मॅडम व दीक्षित मॅडम यांच्या हस्ते प्रशिक्षकांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या शिबिरात प्राचार्य बगनर सर, विभाग प्रमुख वाबळे सर, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
जगभरातील १८० देशांमध्ये कार्यरत असलेल्या “द आर्ट ऑफ लिविंग” संस्थेचे संस्थापक प.पू. श्री श्री रविशंकरजी यांनी विद्यार्थ्यांसाठी खास रचलेला हा कोर्स “मुलांसाठी नवजीवन देणारा आणि उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवणारा” ठरल्याचे मत प्राचार्य व शिक्षकांनी व्यक्त केले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, आनंद आणि सकारात्मकतेचा नवा उत्साह निर्माण झाल्याचे पहायला मिळाले.


