महाराष्ट्रविशेषशहर
Trending

जेजुरीत आपत्कालीन सेवेचा बोजवारा; डिझेल नसल्याने १०२ रुग्णवाहिका बंद

जेजुरीत आपत्कालीन सेवेचा बोजवारा; डिझेल नसल्याने १०२ रुग्णवाहिका बंद

मयुर कुदळे

जेजुरी प्रतिनिधी

जेजुरी ग्रामीण रुग्णालयातील शासनाची महत्त्वाकांक्षी १०२ रुग्णवाहिका सेवा डिझेलअभावी ठप्प असल्याची गंभीर बाब गुरुवारी (दि. २५ डिसेंबर) सायंकाळी उघडकीस आली. प्रसूती झालेल्या एका महिलेला अचानक तीव्र रक्तस्राव सुरू झाल्याने तातडीने बारामती येथील महिला रुग्णालयात हलविणे अत्यावश्यक होते. मात्र रुग्णालयातील १०२ रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याने सेवा देणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले.
या प्रकारामुळे रुग्णाच्या नातेवाइकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. गंभीर अवस्थेत असलेल्या महिलेला वेळेवर उपचार मिळणे अत्यंत गरजेचे असताना रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. अखेर वैद्यकीय अधीक्षक यांना संपर्क केल्यानंतर जेजुरी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रताप साळवे यांनी माणुसकी दाखवत स्वतःच्या खिशातून डिझेलसाठी पैसे दिले. त्यानंतर रुग्णवाहिकेत डिझेल भरून ती तत्काळ बारामतीच्या दिशेने रवाना करण्यात आली.
डिझेलअभावी उभी असलेली १०२ रुग्णवाहिका अखेर प्रसूती झालेली महिला, तिचे नवजात बाळ व नातेवाइकांसह पुढील उपचारासाठी रवाना झाली. सुदैवाने वेळेत उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र ग्रामीण भागातील रुग्णांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या आपत्कालीन सेवेची अशी दयनीय अवस्था पाहून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, रुग्णालय प्रशासनाकडून शासनाची डिझेलसाठीची ग्रँट मंजूर नसल्याचे कारण सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रवाह न्यूजच्या प्रतिनिधी मयुर कुदळे यांनी पुणे येथील १०२ सेवेच्या जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ पर्यायी व्यवस्था करत असल्याचे स्पष्ट केले. तसेच, या प्रकरणाची चौकशी करून वरिष्ठांकडे अहवाल सादर केला जाईल आणि लवकरात लवकर डिझेलसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागाला कळविण्यात येईल, असे आश्वासन दिले.
भविष्यात अशा प्रकारची गंभीर घटना घडू नये यासाठी आरोग्य विभाग व रुग्णालय प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button