जेजुरीतील महत्त्वाचा पाणी प्रश्न सुटणार… भाजपच्या प्रयत्नांना यश.

जेजुरीतील महत्त्वाचा पाणी प्रश्न सुटणार… भाजपच्या प्रयत्नांना यश.
नमस्कार, जेजुरी शहरात सध्या सर्वत्र पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. मध्यंतरीच्या काळात जेजुरी शहरातील काही भागांमध्ये अक्षरशः चार चार दिवस पाणी येत नव्हते. तर सध्या दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच पाणी संकटामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. अशातच सर्व शाळांना उन्हाळी सुट्टी लागत असल्यामुळे येणाऱ्या दोन महिन्यात जेजुरीत भाविक व यात्रेकरूंची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढणार आहे त्यावेळेस ही पाण्याची समस्या अधिक तीव्रतेने जाणवणार आहे. जेजुरीत रस्ते, ड्रेनेज इत्यादी कामे करण्यात आली. मात्र पाण्यासारख्या महत्त्वाचा प्रश्नाने जेजुरी शहरात गंभीर स्वरूप धारण केले होते. समाज माध्यमावर या पाणी प्रश्नावरून नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या.. याच सर्व परिस्थितीचा अभ्यास करून भारतीय जनता पक्षाचे जेजुरी शहराध्यक्ष सचिन पेशवे यांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे पाणी प्रश्न संदर्भात चर्चा केली होती. व त्या अनुषंगाने चंद्रकांत पाटील यांनी जेजुरी ला पाणीपुरवठा करणाऱ्या नाझरे पंप हाऊस व जलशुद्धीकरण केंद्राच्या बाबींसाठी निधी मंजूर केला आहे. सध्या पाणीटंचाईमुळे जेजुरीतील नागरिक त्रस्त झाले असताना या प्रश्नावर बोलायला कोणीच तयार होत नव्हते. गेल्या वर्षी दिवाळीच्या पूर्वीच जेजुरी शहराला पाणीपुरवठा करणारा नाजरे जलाशय ओव्हरफ्लो झाला होता. मात्र तरीही जेजुरी शहरात पाणीटंचाई जाणवतच आहे. भारतीय पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात सचिन पेशवे यांना जेजुरीतील पाणीटंचाई बाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले होते त्यावेळी त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सचिन पेशवे यांनी असे सांगितले होते की तातडीने पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन जेजुरीचा हा महत्त्वाचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून भाजप शहराध्यक्ष सचिन पेशवे यांनी याबाबतचा सातत्याने पाठपुरावा पालकमंत्री यांच्याकडे केला होता व त्यांच्या प्रयत्नांना यश येत पालकमंत्र्यांनी सदर कामासाठी निधी मंजूर केला आहे त्यामुळे लवकरच जेजुरी करांची पाणीटंचाईच्या समस्येतून मुक्तता होणार आहे असे सचिन पेशवे यांनी सांगितले.


