
जेजुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी जयदीपभैय्या बारभाई यांची वर्णी;
भाजपचे सचिन सोनवणे पराभूत
मयूर कुदळे
जेजुरी प्रतिनिधी :जेजुरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दमदार कामगिरी करत जेजुरी नगरपरिषदेवर पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नगराध्यक्षपदाच्या थेट लढतीत राष्ट्रवादीचे जयदीपभैय्या दिलीपदादा बारभाई यांनी भाजपचे उमेदवार सचिन सोनवणे यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला.
या निवडणुकीत जयदीपभैय्या दिलीपदादा बारभाई यांना ७३०४ मते मिळाली, तर भाजपचे सचिन सोनवणे यांना ३७८९ मते आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विठ्ठल सोनवणे यांना ११६५ मते मिळाली.
२ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या मतदानात जेजुरी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण १५,८०० मतदारांपैकी १२,३३३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत ७८ टक्क्यांहून अधिक मतदान नोंदवले गेले. त्यानंतर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी जाहीर झाल्याने सर्वच उमेदवारांची धडधड वाढली होती.
रविवारी सकाळी १० वाजता जेजुरी येथील मल्हार नाट्यगृहात मतमोजणीला सुरुवात झाली. शेवटपर्यंत अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. भाजपचे सचिन सोनवणे यांनी तगडे आव्हान उभे होते; मात्र प्रत्येक फेरीमध्ये जयदीपभैय्या बारभाई यांनी आघाडी कायम ठेवत विजयश्री खेचून आणली.
नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी अजितदादा गटानेच बाजी मारली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे १७ नगरसेवक, भाजपाचे २ नगरसेवक तर अपक्ष १ नगरसेवक निवडून आले आहेत.
निकाल जाहीर होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत, भंडाऱ्याची उधळण करत जल्लोषात विजयोत्सव साजरा केला. शहरातील विविध भागांत नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयदीपभैय्या बारभाई तसेच सर्व विजयी नगरसेवकांचे अभिनंदन करण्यात आले.
राष्ट्रवादीच्या या पुनरागमनानंतर पुढील पाच वर्षे जेजुरी शहराच्या विकासासाठी निर्णायक ठरणार असल्याचा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. नवीन नेतृत्व व नवनिर्वाचित नगरसेवकांच्या संघटित ताकदीमुळे शहरात विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी चर्चा शहरात सुरू आहे.
विजयी नवनिर्वाचित नगरसेवक :
प्रभाग १ : भक्ती वैभव कोरपड, योगेश रोहिदास जगताप
प्रभाग २ : — प्रज्ञा पंकज राऊत, स्वप्निल सुरेश हरपळे
प्रभाग ३ : —अमिना मेहबूब पानसरे, तानाजी दादा खोमणे (अपक्ष)
प्रभाग ४ : — स्नेहल गौतम भालेराव, मेघा सत्यवान उबाळे,
प्रभाग ५ : —स्वरूपा जालिंदर खोमणे, कृष्णा रूपचंद कुदळे
प्रभाग ६ : — नीलम सुधीर सातभाई, गणेश मच्छिंद्रनाथ निकुडे
प्रभाग ७ : — मोनिका राहुल घाडगे , अस्लम पानसरे
प्रभाग ८ : — गणेश डोंबे (भाजपा), प्रियंका अजिंक्य देशमुख (भाजपा)
प्रभाग ९ : — मंदा रमेश बयास, रोहित अशोक खोमणे
प्रभाग १० : —योगिता देवेंद्र दोडके, शिवाजी दत्तात्रय जगताप
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शीतल मुळे तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून चेतन कोंडे यांनी जबाबदारी पार पाडत शांततेत व पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली.


