
जेजुरीगडावर सहलीसाठी आलेल्या ११ मुलींची प्रकृती बिघडली
मयुर कुदळे
जेजुरी प्रतिनिधी
जेजुरी येथे श्री खंडोबा देवाच्या दर्शनासाठी आलेल्या शाळेच्या सहलीदरम्यान गड चढताना अचानक त्रास होऊन प्रकृती बिघडल्याने शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेत ११ विद्यार्थिनींना अस्वस्थता जाणवल्याने त्यांना तात्काळ जेजुरी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
लातूर जिल्ह्यातील किनगाव (ता.अहमदपूर) येथील भगवान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयची ३ दिवसीय शैक्षणिक सहल १६९ विद्यार्थ्यांसह तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूर, पन्हाळा गड आदी ठिकाणी दर्शन घेत जेजुरीत सायंकाळच्या सुमारास दाखल झाली होती. ५ जानेवारी रोजी सायंकाळी उशिरा सहल जेजुरीत पोहोचल्यानंतर खंडोबा मंदिर रात्री ९ वाजता बंद झाले असल्याची माहिती न मिळाल्याने , शिक्षकांनी खंडोबा देवाचे दर्शन मिळावे यासाठी विद्यार्थ्यांना घेऊन घाईघाईत जेजुरीगड चढण्यास सुरुवात केली.
गड चढताना काही विद्यार्थिनींना चक्कर येणे, थकवा व अस्वस्थता जाणवू लागली. काही वेळातच ही संख्या वाढत गेली आणि एकूण ११ मुलींना त्रास जाणवू लागला.
शाळकरी मुलांमध्ये उडालेला गोंधळ पाहून मल्हार राऊत व हरिदास रत्नपारखी यांनी प्रत्यक्ष परिस्थिती पाहत तत्काळ प्रसंगावधान दाखवत श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी यांच्या रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. रुग्णवाहिका चालक रविशंकर लाखे, सौरभ सकट, सचिन लोणकर, हरिदास रत्नपारखी यांनी विद्यार्थिनींना शिक्षकांसमवेत उपचारासाठी सुरक्षितपणे ग्रामीण रुग्णालयात पोहोचवले. दरम्यान एकाचवेळी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी दाखल झाल्याने रुग्णालय प्रशासन तात्काळ सतर्क झाले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. जेजुरी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक दीपाली पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णालयात भेट देत घटनेची पाहणी केली.
वैद्यकीय तपासणीनंतर सलग प्रवास, अपुरी विश्रांती तसेच गड चढताना झालेली धावपळ यामुळे विद्यार्थिनींना त्रास झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन तावरे यांनी सांगितले.
ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन तावरे, डॉ.माया वानखेडे, डॉ.सागर पाथरीकर, डॉ. आदिती गुप्ता व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तत्परतेने उपचार करून काही तास विद्यार्थिनींना निरीक्षणाखाली ठेवले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना तेथून जाण्यास परवानगी देण्यात आली. दरम्यान, रात्री उशीर झाल्याने रुग्णालयात दाखल असलेल्या विद्यार्थिनींसाठी सामाजिक कार्यकर्ते सदानंद बारभाई यांनी मोफत जेवणाची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकी जपली. तसेच घटनेची माहिती मिळताच जेजुरी आय.सी.यू. हॉस्पिटलचे संचालक डॉ.अनिल कदम आणि सहकारी डॉ.रोशन यादव हे देखील कार्डियाक ॲम्बुलन्ससह ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांनीही विद्यार्थिनींची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते हरिदास रत्नपारखी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना महत्त्वाची मागणी केली. “रात्रीच्या वेळी मंदिर बंद झाल्यानंतर भाविकांनी गडावर जाण्याचा प्रयत्न करू नये यासाठी नंदी चौक येथील पहिली पायरी तसेच जुनी जेजुरी येथील प्रवेशद्वाराजवळ देवसंस्थानमार्फत सुरक्षा रक्षक नेमावेत व त्यांनी मंदिर बंद झाल्याची माहिती भाविकांना देत गडावर जाण्यास मज्जाव करावा”. यामुळे भविष्यात असे प्रकार टळतील तसेच गडाची सुरक्षितता व भाविकांचे संरक्षण होण्यास मोठी मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या घटनेनंतर सहलीचा उर्वरित कार्यक्रम पूर्ण करून सर्व विद्यार्थ्यांना घेऊन किनगाव (जि.लातूर) कडे सुरक्षितपणे जाणार असल्याची माहिती शिक्षकांनी दिली.


