
जेजुरीत अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांकडून भंडारा तपासणीचे धाडसत्र
दुकानांची तपासणी करत नमुने केले गोळा
मयुर कुदळे
जेजुरी प्रतिनिधी
जेजुरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी पार पडली. निकालानंतर लगेचच विजयी उमेदवारांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष करत मिरवणूक काढली. या मिरवणुकीदरम्यान भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली होती. मात्र, जेजुरी येथील खंडोबा गडाच्या पहिल्या पायरीपाशी दर्शनासाठी जमा झालेल्या रॅलीच्या ठिकाणी अचानक भंडाऱ्याचा मोठा भडका उडाल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत दोन नवनिर्वाचित नगरसेवकांसह १४ ते १५ समर्थक व कार्यकर्ते भाजले गेले. सुदैवाने सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून प्रसारमाध्यमांतून मोठ्या प्रमाणावर बातम्या प्रसारित झाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर आज सोमवारी रोजी जेजुरी शहर फेरीवाला समितीचे सदस्य शांताराम पांडुरंग खोमणे तसेच बहुजन पँथरचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाफर मेहबूब मुलानी यांनी प्रशासनाकडे निवेदन देत घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली .
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सोमवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास अन्नसुरक्षा अधिकारी, पुणे विभाग यांच्या पथकाने जेजुरी बाजार पेठेतील भंडारा विक्री करणाऱ्या दुकानांवर अचानक तपासणी मोहीम सुरू केली. या कारवाईदरम्यान विविध ठिकाणांहून भंडाऱ्याचे नमुने गोळा करण्यात आले असून ते पुणे येथील राज्य अन्न व औषध प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती अन्नसुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांनी दिली.
तपासणीदरम्यान विक्रीसाठी भंडाऱ्याने भरलेली एक छोटी पिकअप वाहन देखील ताब्यात घेण्यात आली आहे. या कारवाईत महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सावळे, अन्नसुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर, डॉक्टर संदीप शिंदे, ड्रग्स इन्स्पेक्टर रजिया शेख यांच्यासह जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे व अधिकारी अण्णासाहेब देशमुख उपस्थित होते.
दरम्यान, काही नागरिकांनी गडावर उधळलेला व जमिनीवर पडलेला भंडारा गोळा करून तो चाळून पुन्हा बाजारपेठेत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार सुरू असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, केवळ एक-दोन ठिकाणचेच नव्हे तर सर्व भंडारा विक्री केंद्रांवरील नमुने सरसकट तपासणीसाठी घ्यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
निवडणूक आनंदाच्या जल्लोषात घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी असून भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाचा भंडारा विक्री करणाऱ्या तसेच त्याचा पुरवठा करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक, व्यापारी आणि विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.


