
जेजुरीमध्ये रंगला “मल्हार चषक” चा थरार
मयुर कुदळे
जेजुरी प्रतिनिधी
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री मल्हारी मार्तंडाच्या मंदिरनगरीत २९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान क्रिकेटप्रेमींसाठी एक भव्य सोहळा रंगला आहे. एस. आर. आर. क्रिकेट फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित पुरंदर प्रीमियर लीग – मल्हार चषक २०२५ या दिवस-रात्र क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नवीन पालखी मैदान, जेजुरी येथे करण्यात आले आहे.
या स्पर्धेत पुरंदर तालुक्यातील तसेच परिसरातील नामांकित संघ सहभागी होत असून, स्थानिक युवा क्रिकेटपटूंना आपली प्रतिभा दाखविण्याची संधी मिळाली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त मंगेश घोणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुमीत काकडे, शिवाजी जगताप आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात झाले असून, रात्रीच्या प्रकाशात रंगणारे सामने प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरले आहेत.
स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करणाऱ्या संघांना आकर्षक चषक, मानपत्रे आणि रोख पारितोषिके देखील देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. तसेच सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि कर्णधार या वैयक्तिक पुरस्कारांचाही यामध्ये समावेश आहे.
आयोजक समितीने यावेळी सांगितले की, “या स्पर्धेचा उद्देश ग्रामीण भागातील तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्यातील क्रीडास्पृहा वाढवणे हा आहे. जेजुरीसारख्या ऐतिहासिक नगरीत अशी प्रीमियर लीग आयोजित करणे ही अभिमानाची बाब आहे.”
स्पर्धेचे नियोजन वृशांत भोसले, संतोष इंदलकर, महेश उबाळे, भाग्यवान म्हस्के, प्रवीण झगडे, शरद पवार, शकील शेख, बंटी घाटे, तेजस शिर्के, सोनू मुळे व आशिष कदम यांनी केले. तर समालोचक आर. जे. ऋषी पवार आणि विजय साकोरे यांनी समालोचन केले.
मैदानावर उत्कृष्ट प्रकाशयोजना, प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था आणि थेट समालोचन यामुळे स्पर्धेचे स्वरूप प्रादेशिक क्रिकेट महोत्सवासारखे झाले आहे.जेजुरी आणि पुरंदर परिसरातील क्रीडाप्रेमींनी या “मल्हार चषक २०२५” स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, क्रिकेटचा हा थरार पाहण्यासाठी नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.


