
पंढरपूर-घुमान (पंजाब) रथ यात्रेचे जेजुरीत भव्य स्वागत
वार्ताहर
जेजुरी
श्रीक्षेत्र पंढरपूरहुन -घुमान ( पंजाब) येथे निघालेल्या श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पालखी रथ व सायकल रॅलीचे खंडेरायाच्या जेजुरी नगरीत उत्साहाने स्वागत करण्यात आले.
पंढरपूर येथे रविवारी( दि.२ ) कार्तिक एकादशीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या यात्रेचा शुभारंभ केला. ही यात्रा २५०० किलोमीटरचा प्रवास करणार असून मोठ्या संख्येने सायकल स्वार या यात्रेत सहभागी झाले आहेत. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी यात्रा पंजाब प्रांतात पोहोचणार आहे.
आज सकाळी ११ वाजता जेजुरी येथे रथयात्रा आली तेव्हा श्री संत काशिनाथ महाराज विठ्ठल मंदिरामध्ये पालखी सोहळ्याचे टाळ मृदुंगाच्या जयघोषात स्वागत करण्यात आले .
श्री खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे, ह. भ. प. सयाजी महाराज मोहरकर, जेजुरी सेवा संघाचे प्रकाश खाडे, डॉ .नितीन केंजळे, शिवसेनेचे शहराध्यक्ष विठ्ठल सोनवणे, संजय निरगुडे ,नंदकुमार निरगुडे ,प्रसाद वनारसे, समस्त शिंपी समाज महिला मंडळाच्या कार्यकर्त्या गौरी मुळे, अनिता निरगुडे, आशा नाझरे आदींनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
मंगेश घोणे यांनी भागवत धर्म प्रसारक मंडळ, व पालखी सोहळा पत्रकार संघ यांनी आयोजित केलेल्या पालखी सोहळ्यामुळे भागवत धर्माचे तत्त्वज्ञान इतर राज्यांमध्ये पोहोचत आहे. संत नामदेव महाराज हे सर्व समाजाचे महान संत होते. ते आपले आदर्श आहेत ,असे सांगितले. सयाजी मोहरकर यांनी श्री संत नामदेव महाराजांनी भागवत संप्रदायाची पताका साऱ्या देशभर नेली. संतांचा आदर्श व भागवत संप्रदायावरील भक्ती आपल्याला प्रेरणा व बळ देतात असे सांगितले .
गेल्या चार वर्षापासून श्रीक्षेत्र पंढरपूर ते घुमान अशी रथयात्रा काढण्यात येत असून या रथयात्रेत यंदा ११० सायकल स्वार सहभागी झाले आहेत. यातील काहीजण ६५ वर्षांपुढील आहेत .पंढरपूर हे श्री संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान तर श्रीक्षेत्र घुमाण ,(पंजाब )हे त्यांचे कार्यस्थान आहे .तेथे त्यांनी १८ वर्षे वास्तव्य केले होते. त्यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी ही यात्रा असल्याचे यात्रेचे संयोजक सूर्यकांत भिसे यांनी सांगितले.
२३ नोव्हेंबर २०२५ रोजी पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांच्या हस्ते चंदीगड येथे या पालखी सोहळा यात्रेचे स्वागत होणार आहे.


