Uncategorizedमहाराष्ट्रविशेषशहर

जेजुरी शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता सुळसुळाट; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.उपाययोजना सुरू :प्रशासन कडून स्पष्टीकरण.

📰 जेजुरी शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता सुळसुळाट; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. उपाययोजना सुरू :प्रशासन कडून स्पष्टीकरण.

जेजुरी (प्रतिनिधी) :
जेजुरी शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील प्रमुख रस्ते, शाळा परिसर, बाजारपेठ, बसस्थानक तसेच उपनगरांमध्ये भटक्या कुत्र्यांचे टोळके मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. या कुत्र्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक धास्तावले.दररोज सकाळी शाळेत जाणारी लहान मुले व संध्याकाळी परतताना भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला सामोरे जात आहेत. अनेक ठिकाणी कुत्र्यांचे थवे एकत्र येऊन रस्त्यावर धाव घेत असल्याने अपघात घडण्याचा धोका वाढला आहे. सायकलस्वार, दुचाकीस्वार तसेच पायी जाणारे प्रवासी यांना याचा त्रास होत असून, विशेषतः वृद्ध व महिला या कुत्र्यांच्या भीतीने धास्तावल्या आहेत.

🔹 आरोग्य धोक्यात
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न केवळ भीतीपुरता मर्यादित नसून तो आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. रेबीजसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका कायम असल्याने नागरिकांना सतत भीतीत राहावे लागत आहे. तज्ज्ञांच्या मते, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भटक्या कुत्र्यांचे लसीकरण व नसबंदी मोहिमा राबविणे अत्यावश्यक आहे.

🔹 तातडीने उपाययोजना आवश्यक
जेजुरी शहर पर्यटन व धार्मिक दृष्ट्या महत्वाचे असल्याने येथे दररोज हजारो भाविकांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास शहराच्या प्रतिमेलाही बाधक ठरतो. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने तातडीने कुत्रे पकडण्याचे पथक नेमून कारवाई करावी, तसेच लसीकरण आणि नसबंदी मोहिमा राबवाव्यात अशी मागणी होत आहे
.

🔷 याबाबत आम्ही जेजुरी नगर परिषदेचे आरोग्य विभागाचे प्रमुख नागनाथ बिराजदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोकाट कुत्र्याच्या उपायोजना अंतर्गत आज पर्यंत सुमारे 150 कुत्र्यांची रेबीज प्रतिबंधक लस व निबिर्जीकरण करण्यात आली असल्याचे सांगितले. नागरिकांचे आरोग्य विचारात घेऊन ही कारवाई अधिक तीव्र करणार असल्याचेही त्यांनी सांगितले ही कारवाई अजूनही पुढे सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button