“शासन आपल्या दारी” योजनेचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.शिवसेना शहरप्रमुख विठ्ठल सोनवणे यांचे आव्हान!

जेजुरीतील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा विठ्ठल सोनवणे यांचे आव्हान.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवार दि.३ जुलै रोजी महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाच्या नगरीत शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच मार्तंड देवसंस्थांनच्या विकास आराखड्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या ३५० कोटी पैकी पहिल्या टप्प्यातील ११९ कोटी रु निधीच्या विकास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम यावेळी पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विजय शिवतारे यांनी जेजुरी येथील कडेपठार रोडवर नव्याने तयार करण्यात आलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मैदानावर तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यां समवेत शनिवारी पहाणी केली व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योग्य त्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप आबा यादव, प्रांताधिकारी मुल्ला साहेब, तहसीलदार विक्रम रजपूत, पोलीस उप अधीक्षक बरडे, जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले, सर्कल लाखे, तलाठी मेचकर, नगरपालिकेचे खोमणे, बगाडे, जेजुरी पोलीस स्टेशनचे गावडे, व देशमुख साहेब तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य माणिक निंबाळकर, जेजुरी शिवसेना शहरप्रमुख विठ्ठल सोनवणे व सर्व शिवसेना कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते.
शासन आपल्या दारी या कार्यक्रमांमध्ये संजय निराधार योजना, घरकुल योजना, दिव्यांगांसाठी असणारे योजना, रेशन कार्ड दुरुस्ती, रेशन कार्ड वाटप, रेशनिंग कार्ड नवीन काढणे , जन्ममृत्यु नोंदी, शेती विभागाच्या असणाऱ्या सर्व योजना, सातबारा वरती वारस नोंद करणे, शेतकऱ्यांना अनुदानित ट्रॅक्टर वाटप व नवीन अर्ज करणे अशा सर्व शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी घेता यावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रमाचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान जेजुरी शहर प्रमुख विठ्ठल सोनवणे यांनी केले आहे.


