“आषाढी एकादशी दिवशी कुर्बानी नाही” जेजुरीतील मुस्लिम बांधवांचा महत्वपूर्ण निर्णय!

जेजुरी,दि.२७( वार्ताहर) यंदाचे वर्षी गुरुवारी (दि.२९)आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी येत असली तरी ,आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी कुर्बानी देणार नाही .फक्त ,सणाची नमाज अदा करण्यात येणार आहे.तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (दि.३०) बकरी ईद सण साजरा करणार असल्याचे जेजुरी येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने सांगण्यात आले.जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांचेकडे तसे निवेदन देण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या धार्मिक विधीमध्ये मुस्लिम समाज बांधव मानकरी आहे. मोठ्या श्रद्धेने येथील बांधव कुलदैवताच्या जत्रा यात्रा उत्सवांमध्ये सहभागी होत आपली सेवा- भोळीभाबडी भक्ती श्रींच्या चरणी अर्पण करतो. आणि सामाजिक बांधिलकी जोपासतो ,गतवर्षीही दोन्ही सण एकाच दिवशी आले होते.त्यावेळीही फक्त नमाज अदा करण्यात आली होती.आणि दुसऱ्या दिवशी सण साजरा करण्यात आला होता.त्याचप्रमाणे यावर्षीही तीच परंपरा जोपसणार असल्याचे माजी नगरसेवक तथा उद्योजक मेहबूब पानसरे यांनी सांगितले.यावेळी रफिक पानसरे,अमीर बागवान ,समीर मुलाणी ,इस्माईल काझी ,दस्तागिर शेख,आदी बांधव उपस्थित होते.


