
पेन्शन चालू करतो अशी बतावणी करत वृद्ध जोडप्याला घातला गंडा…!


वृद्ध जोडप्यांचा विश्वास संपादन करत तुम्हा दोघांनाही दर महिना पंधराशे रुपयाची पेन्शन चालू करून देतो. असे सांगत एकाने सुमारे तेरा हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे सदर फसवणुकीबाबत संभाजी गणपतराव गावडे राहणार. गुणवडी तालुका बारामती यांनी बारामती पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, आदित्य संतोष पाटोळे राहणार काटेवाडी तालुका बारामती यांने संभाजी गणपतराव गावडे यांच्याकडून तुम्हा दोघा नवरा बायकांना प्रत्येकी पंधराशे रुपये पेन्शन चालू करून देतो. असे सांगून रुपये तीन हजार रुपये रोख घेतले.

व पुन्हा संभाजी गावडे यांचा मुलगा जव्हार गावडे यांच्याकडून सुमारे दहा हजार रुपये घेतले. तसेच फिर्यादी कडून घेतलेल्या तीन कोरे चेकचा त्याने गैर वापर केला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
बारामती शहर पोलिसांनी या संदर्भात भारतीय दंड विधान कलम ४६७,४६८,४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जगदाळे व सहाय्यक फौजदार सातपुते करत आहेत.


