
अजित पवार मुख्यमंत्री होणार का? वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर जोरदार चर्चा….।
नमस्कार, आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे .संपूर्ण राज्यभर त्यांचे कार्यकर्ते ,चाहते यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मात्र यावेळी शुभेच्छांमध्ये एक गोष्ट महत्वपूर्ण दिसून येत आहे. ती म्हणजे आपल्या नेत्याचा उल्लेख राज्याचे भावी मुख्यमंत्री करताना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पोस्ट फिरत आहेत. योगायोगाने गेल्या पाच वर्षात अजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सामील झाले आहेत. राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांच्या कारभार सुरू असताना अचानक महाविकास आघाडीचे नेते व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सरकारमध्ये एन्ट्री करत पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. मात्र तरीही दादांना चाहणारा त्यांचा वर्ग अजिबातही कमी झालेला नाही. दादांचा रोखठोक स्वभाव, निर्णय क्षमता व कार्यकर्त्यांना न्याय देण्याची पद्धत यामुळे आजही लाखो लोकांचे पाठबळ त्यांच्या पाठीमागे आहे. पण महाविकास आघाडी सरकार असताना अजित पवार यांना अर्थमंत्री पदाची जबाबदारी दिल्यानंतर आजच्या शिंदे गटातील आमदार यांनी त्यावेळेस अजित पवार यांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. मात्र तेच अजित पवार आज पुन्हा उपमुख्यमंत्री व राज्याच्या अर्थमंत्रीपदी विराजमान झाले असून शिंदे गटातील आमदारांची मोठी कोंडी झाली आहे. त्यातच सोशल मीडियावर वारंवार अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख होत असल्याने शिंदे गटात अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत चक्क ” मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की” अशा प्रकारचे शीर्षक दिले आहे. त्यांच्या या ट्विटची सुद्धा सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे.



