उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतला जेजुरी देवस्थानचा आढावा.. दिले महत्वाचे निर्देश..
२१ जुलै २०२३
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतला जेजुरी देवस्थानचा आढावा. मंदिराच्या विकासाबाबत विधानभवनात झाली बैठक.
सेंद्रिय हळद वापरण्याचे दिले निर्देश.
मुंबई दि.२१: जेजुरी येथील श्री. मार्तंड देवसंस्थान मंदिरात भाविकांनी दिलेल्या देणगीचा हिशोब योग्य पद्धतींने ठेवण्यासाठी नवीन पावती पुस्तक छापून घ्यावीत. त्यावर पुस्तक क्रमांक आणि पावती क्रमांक टाकावा. या सगळ्याची नोंद ठेवण्यासाठी व्यवस्थित अशी यंत्रणा तयार करण्याचे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.
आज विधानभवनात नरेंद्र दराडे यांनी विनंती अर्ज समितीकडे पुणे जिल्ह्यातील श्री. मार्तंड देवसंस्थान, जेजुरी या देवस्थानामधील गैरकारभराबाबतच्या विषयासंदर्भात केलेल्या अर्जावर बैठक घेण्यात आली.
यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, जेजुरी देवस्थान येथील भाविकांना VIP पास दिल्यानंतर भाविकांना अधिकृत पावती द्यावी जेणे करून देवस्थान कामकाजात पारदर्शकता येईल. देवस्थानासह परिसरात हळद- कुंकू दिले जाते त्यामध्ये नैसर्गिक हळदीचा वापर व्हावा, या साठी शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाने तेथील हळदीची तपासणी करावी व मगच ती वापरत आणावी असे डॉ. गोऱ्हे यांनी निर्देश दिले. मंदिरामध्ये देण्यात येणाऱ्या प्रसादाची तपासणी वेळोवेळी केली पाहिजे. नवीन पावती पुस्तके १५ ऑगस्ट पर्यंत छापून घेण्यात यावीत याची अंमलबजावणी तहसीलदार यांनी करावी असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. पुढच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांना बोलावून देवस्थानच्या ट्रस्ट च्या जमिनींच्या प्रकरणांची सद्यस्थिती समजून घेऊ आणि देवस्थानच्या निधीचा वापर कसा होणार याबाबत विचारणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानपरिषद सदस्य दराडे यांनी, देवस्थानच्या ट्रस्ट अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती कोणा मार्फत झाली याची माहिती घेतली. तसेच नैसर्गिक हळदीच्या वापरावर भर देण्याचे त्यांनी सांगितले. गावातला पैसा गावातच कसा राहील यादृष्टीने नियोजन करण्याचे दराडे यांनी सांगितले.
आमदार संजय जगताप यांनी देवस्थान करिता प्रशासकीय स्तरावर कामकाजात मदत करण्यासाठी स्वतंत्र नायब तहसीलदार स्तरावरील अधिकारी नेमण्याची विनंती केली.
सहाय्यक धर्मदाय आयुक्त बुक्के यांनी जवळपास १०२ लोकं ट्रस्टवर काम करत असल्याचे सांगितले. देवाच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचा इन्शुरन्स केला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच देवस्थानच्या मोठ्या प्रमाणावर जमिनी असून त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
या बैठकीला, विधान परिषद सदस्य नरेंद्र दराडे, सचिन अहिर,. महादेव जानकर,. राजेश राठोड, उमा खापरे, डॉ. प्रज्ञा सातव, विधानसभा सदस्य संजय जगताप, . हेमंत महाजन, धर्मदाय आयुक्त, मुंबई सहायक धर्मदाय आयुक्त, पुणे बुक्के, उपसचिव वैशाली सुळे, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, तहसीलदार . विक्रम रजपूत, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव राजेश तारवी, अवर सचिव, .मोघल यांसह देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.