विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणी मुख्याध्यापकासह शिक्षकाला सात दिवस पोलीस कोठडी… धक्कादायक घटनेने पुणे जिल्हा हादरला
(प्रेम ओतारी):- मळद ता. दौंड येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयातील आठ ते नऊ विद्यार्थिनींचे शाळेतील शिक्षकानेच लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (ता.22) उघडकीस आला आहे. याप्रकरणी दौंड पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापकासह शिक्षकाला गुरुवारी मध्यरात्री बेड्या ठोकल्या आहेत. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुख्य आरोपी शिक्षक बापूराव धुमाळ व मुख्याध्यापक सुभाष भीमराव वाखारे असे कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात आरोपी बापूराव धुमाळ हा इंग्रजी विषयाचे अध्यापन करीत आहे. आरोपी बापूराव धुमाळ याने सातवी, आठवी आणि नववीमध्ये शिकत असणाऱ्या आठ ते नऊ विद्यार्थिनींना व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल आणि इतर साधनांचा वापर करत अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल आणि अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
दरम्यान, हा प्रकार पालकांना समजल्यानंतर शाळेमध्ये जाऊन संतप्त पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मुख्याध्यापक सुभाष वाखारे यांना अटक केली होती. मात्र मुख्य आरोपी फरार झाला होता. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.