
सासवड येथे दि डेक्कन मर्चंट बँकेला भीषण आग..

नमस्कार आज सासवड येथे दि डेक्कन मर्चंट को-ऑपरेटिव बँक लिमिटेड सासवड हडको रोडवर आज सकाळी अचानक इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट होऊन बँकेला भीषण आग लागली. यामध्ये बँकेचे कम्प्युटर इतर साहित्य फर्निचर इलेक्ट्रिकल साहित्य खुर्च्या टेबल तसेच महत्त्वाचे कागदपत्रे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

यावेळी जेजुरी नगरपालिकेचे अग्निशामक दल व सासवड नगरपालिकेच्या अग्निशामन दल यांनी अग्निविरोधक साहित्यकाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. सासवड पोलीस स्टेशन तर्फे खबरदारीचा उपाय म्हणून आगीच्या स्थळापासून सर्वांनी लांब जावे असे सांगण्यात आले . सासवड पोलीस स्टेशनमध्ये याची फिर्याद दाखल झाली असून बँकेला आग लागल्यानंतर लगेच वीजपुरवठा तत्काळ खंडित करण्यात आल्याचे एमएसईबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार वातानुकूलित यंत्रणेमध्ये शॉर्टसर्किट होऊन सदर आग लागल्याने बँकेतील महत्त्वाचे कागदपत्रे व साहित्य जळून खाक झाले आहे. मंगळवारी सकाळी सुमारे पावणेदहाच्या सुमारास आग लागली. या आगीत कोणतीही मनुष्यहानी झाली नसली तरी ईतर साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी सासवड पोलीस स्टेशन येथे दिली आहे. सदर घटनेचा पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार चिखले हे करीत आहेत.



