निवडणुकीच्या विजय रॅलीदरम्यान जेजुरीत भंडाऱ्याचा उडाला भडका.सात ते आठ जण भाजले

निवडणुकीच्या विजय रॅलीदरम्यान जेजुरीत भंडाऱ्याचा उडाला भडका
सात ते आठ जण भाजले
मयुर कुदळे
जेजुरी प्रतिनिधी :
नवनिर्वाचित नगरसेवकांच्या विजयी मिरवणुकीदरम्यान जेजुरी शहरात अपघाताची दुर्दैवी घटना घडली. २१ डिसेंबर रोजी जेजुरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा नुकताच निकाल जाहीर झाला होता. या निवडणुकीमध्ये विजयी झालेले उमेदवार आणि समर्थक कार्यकर्ते महाद्वार रोड वरती मिरवणूक आणि झालेला विजय साजरा करत असताना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मिरवणूक रॅलीदरम्यान भंडारा उधळण्यात आला. याचवेळी औक्षणासाठी जवळच असलेल्या आरतीच्या ताटातील ज्योतीमुळे अचानक आगीचा भडका उडाला. या आगीत सात ते आठ जण भाजल्याची घटना घडली.
घटनेनंतर काही काळ परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मात्र उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना तत्काळ जेजुरी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली.
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर असून कोणालाही गंभीर स्वरूपाची इजा झालेली नाही. प्राथमिक उपचारानंतर काही जखमींना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
या घटनेमुळे मिरवणूक व सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भविष्यात अशा कार्यक्रमांमध्ये फटाके, भंडारा व अग्नीचा वापर करताना अधिक दक्षता घेण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


