
रॅलीतून शक्तिप्रदर्शन करत सोनाली चौंडकरांचा अर्ज दाखल

जेजुरी प्रतिनिधी
जेजुरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत विद्यानगर प्रभाग क्रमांक १अ येथील सर्वसाधारण महिला नगरसेवक जागेसाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सोनाली नवनाथ चौंडकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या पार्श्वभूमीवर विद्यानगर परिसरात सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली.
उमेदवारी अर्जासाठी चौंडकर या सकाळी विद्यानगर येथून पायी रॅलीच्या माध्यमातून नगरपरिषद कार्यालयाकडे रवाना झाल्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मार्गक्रमण करत ही रॅली नगरपरिषद परिसरात पोहोचली. मार्गात नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत केले.
अर्ज दाखल केल्यानंतर चौंडकर यांनी पत्रकारांशी बोलताना प्रभागातील नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि स्थानिक समस्या यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता अधोरेखित केली. “नागरिकांनी दाखवलेला विश्वास महत्त्वाचा असून स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू,” असे त्या म्हणाल्या.
या शक्तिप्रदर्शनामुळे विद्यानगर प्रभागातील निवडणुकीची उत्सुकता वाढली असून मुकाबला रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यावेळी गणेश भोसले, चंद्रकांत जगताप, रामा दवणे, संपत पोंदकुले, सुनील वाघ, राहुल बांदल, रोहिदास बांदल, रामदास गदादे, अजित महाकाल, कल्याण वानखडे, तानाजी जाधव, फरांदे, शेंडे, अजित गार्डी, ज्योतीराम काटकर, रामत्त्वंकल वर्मा, श्रीवास्तव, कृष्ण शाह, नितेश माळी यांसह स्थानिक नागरिक उपस्थित होते. वैभव झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली शांततापूर्ण वातावरणात पार पडली.


