ठाकरे बंधू एकत्र येणार ? मनसेच्या या नेत्यांनी घेतली संजय राऊत यांची भेट!

दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार? मनसेच्या या नेत्यांनी घेतली संजय राऊत यांची भेट….
अलीकडच्या काळात महाराष्ट्रात राजकारणाची समीकरणे वेळोवेळी बदलत आहेत. २०१९ मध्ये शिवसेनेने भाजपशी असलेली पारंपारिक युती तोडत काँग्रेस व राष्ट्रवादीशी घरोबा करत महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर राजकीय घडामोडी घडल्याने एकनाथ शिंदे यांनी बंड करत देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने मुख्यमंत्री पद पटकावले. व गेल्याच आठवड्यात राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सर्वांनाच धक्का दिला. या सर्व प्रकारात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तटस्थच राहिले. शिवसेनेच्या बंडानंतर शिवसेनेची राजकीय ताकद कमी झालेली वाटत असतानाच सर्वसामान्य जनतेमध्ये अशावेळी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी मागणी जोर धरू लागली आहे. यात प्रामुख्याने शिवसैनिक व मनसैनिकांची ही इच्छा असल्याचे बोलले जात आहे. जर एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी एकत्र येऊ शकतात. तर दोन बंधू एकत्र येऊ का शकत नाही. हाच प्रश्न सध्या चर्चेला जात आहे. असंच काल मनसे नेते अभिजीत पानसे यांनी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. संजय राऊत व मनसे नेते अभिजीत पानसे यांनी भांडुप ते प्रभादेवी असा एकत्रच कारने प्रवास केला असल्याचे दिसून आले. अभिजीत पानसे यांनी संजय राऊत यांची प्रभादेवीतील सामना कार्यालयात भेट घेतली. मात्र अभिजीत पानसे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना ही भेट वैयक्तिक असल्याचा खुलासा केला. याचा कोणत्याही राजकीय अर्थ काढू नये असेही त्यांनी सांगितले. मात्र तरीही या भेटीची चर्चा काल दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली होती. मनसेकडून अभिजीत पानसे हे युतीचा प्रस्ताव घेऊन आले होते का अशी चर्चा सध्या सगळीकडे आहे.



