
जेजुरीच्या आठवडे बाजार तळ अस्वच्छतेच्या विळख्यात…

कुलदैवत खंडेरायाच्या जेजुरी नगरीचा आठवडे बाजार पुणे पंढरपूर पालखी महामार्ग लगत असलेल्या जिल्हा परिषदेच्या जागेत भरत असतो मात्र सध्या रिमझिम पावसामुळे या बाजार तळाला अक्षरशः घाणीचे स्वरूप आले आहे. ठिकठिकाणी चिखल व सडलेल्या भाज्या यामुळे जेजुरीत गुरुवारी भरत असलेल्या आठवडे बाजारात भाजीपाला खरेदी करताना नागरिकांची दमछाक होत आहे. तसेच या अस्वच्छतेच्या ठिकाणी भाजीपाला घेताना नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोटी रुपये खर्च करून जेजुरी नगर परिषदेने आधुनिक मंडईच्या नावाखाली ओटे व शेड उभे केले आहेत. मात्र त्या ओट्यांचा लिलावच न झाल्याने आजही भाजीविक्रेते भाजी विक्रीसाठी खालीच बसत आहेत .अशातच पुणे पंढरपूर पालखी महामार्गाचे रुंदीकरण झाल्याने जागा कमी पडत असल्याच्या कारणाने भाजीविक्रेते व शेतकरी यांनी थेट धालेवडी रोडवरच ठाण मांडले आहे .त्यामुळे संपूर्ण घालेवाडी रोड हा आठवडे बाजार दिवशी ठप्प होत आहे. धालेवाडी रस्त्यावरून वाहन काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच बाजारासाठी आलेल्या नागरिकांनी व हानी पार्किंग तरी कुठे करायची हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत आम्ही जेजुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांच्याशी संपर्क साधला असता नगरपरिषदेमार्फत बांधण्यात आलेल्या ओट्यांची पुढील आठवड्यात लिलाव पद्धतीने शेतकऱ्यांना वाटप करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच सध्या घाण झालेल्या व चिखल झालेल्या जागेवर मुरूम टाकून सपाटीकरण केले जाईल व संपूर्ण बाजार स्वच्छ ठेवण्याच्या प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी नमूद केले. सध्याचा बाजार तळ हा अपुरा पडत असल्याने सदर आठवडे बाजार हा दुसरीकडे स्थलांतर करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.



