जेजुरीतील प्रभाग १ मधील विद्यानगर परिसरात भाजपाची शक्ती प्रदर्शन पर प्रचार रॅली संपन्न…
जेजुरीतील प्रभाग १ मधील विद्यानगर परिसरात भाजपाची शक्ती प्रदर्शन पर प्रचार रॅली संपन्न…
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर जेजुरी शहरातील प्रचाराला वेग आला असून, प्रभाग क्रमांक १ मधील विद्यानगर परिसरात भारतीय जनता पक्षातर्फे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. शनिवारी संध्याकाळी झालेल्या या रॅलीत कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती दिसून आली.
विद्यानगर मधील दवणे मळा रोड येथील गणपती मंदिरात प्रभाग क्र.१ च्या प्रचाराचा शुभारंभ भाजपचे निष्ठावंत असलेले पदाधिकारी गणेश भोसले यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सोनवणे यांसह नगरसेवक पदासाठी असलेले सोनाली चौंडकर आणि नरेंद्र( हरिभाऊ) पवार हे उमेदवार उपस्थित होते.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सोनवणे यांच्यासह नगरसेवक पदासाठी रिंगणात असलेल्या सोनाली चौंडकर आणि नरेंद्र (हरिभाऊ) पवार यांनी रॅलीत जनतेशी संवाद साधत विकासाची ग्वाही दिली. स्थानिक प्रश्न, सुविधा, पायाभूत विकास आणि स्वच्छ प्रशासन यांसाठी भाजप वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
रॅलीदरम्यान उमेदवारांनी प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, युवकांसाठी रोजगार संधी आणि महिलांसाठी सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले. “जेजुरीचा सर्वांगीण विकास हा आमचा संकल्प असून, प्रभाग १ ला आदर्श प्रभाग बनविणे हे आमचे ध्येय आहे,” असे उमेदवारांनी सांगितले.
रॅलीत विविध वयोगटातील नागरिकांनी सहभाग नोंदवला . परिसरात झालेल्या या शक्ती–प्रदर्शनामुळे नागरिकांच्यात चर्चेला उधाण येऊ लागले आहे. आगामी दिवसांत निवडणूक प्रचाराला आणखी वेग येण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
यावेळी गणेश भोसले ,वैभव झगडे,नवनाथ चौंडकर, चंद्रकांत जगताप, सागर शिंदे, उमा खुंटे यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



