
गावाच्या विकासाची सामूहिक हाक – नागरिकांच्या अपेक्षा आणि वास्तव
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री खंडेरायाची जेजुरी ही अठरापगड जाती-धर्मांनी नांदलेली, परंपरा–संस्कृतीने समृद्ध आणि आपुलकीच्या नात्यांनी जोडलेली नगरी. श्री खंडोबा देवस्थान, कडेपठार देवस्थान आणि सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी समर्थांची महती लाभलेली ही पवित्र भूमी. दरवर्षी हजारो भाविकांचे आगमन, धार्मिक–सांस्कृतिक कार्यक्रम आणि ग्रामदैवतांच्या कृपेने वैभव मिळवणारे हे गाव.
परंतु या तेजोमय परंपरेच्या मागे काही मूलभूत प्रश्न मात्र सतत डोके वर काढताना दिसतात. या प्रश्नांना राजकारणाचे रंग न देता, गावाच्या भविष्यासाठी नागरिकांनी विचार करणे अत्यावश्यक आहे. जेजुरी शहरात वर्षाकाठी आठ ते दहा यात्रा भरतात. यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर यात्रा निधी मिळतो मात्र या निधीच्या खरा उपयोग होतो का हाच मोठा प्रश्न आहे.
१. सुविधांचा कायम अभाव – नागरिकांची पहिली व्यथा-
जेजुरी शहर मोठ्या प्रमाणात विकसित होत असले तरी मूलभूत सुविधा मात्र अपेक्षित प्रमाणात सुधारलेल्या दिसत नाहीत. जेजुरी शहरांमध्ये विद्यानगर लवथळेश्वर बारसोडे नगर स्टेशन परिसर इत्यादी ठिकाणी नागरीकरण झपाट्याने वाढत आहे.
पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता, आरोग्य सुविधा, गर्दी नियंत्रण — या प्राथमिक गरजा पूर्ण होण्यात सतत अडचणी जाणवतात.
२. अपुरी आणि असुविधाजनक आरोग्यसेवा –जेजुरी आणि परिसरात लोकसंख्या वाढत आहे, भाविकांची वर्दळही मोठ्या प्रमाणात वाढते. परंतु, सुसज्ज हॉस्पिटलची कमतरता,तातडीच्या परिस्थितीत उपचार मिळण्यातील विलंब, ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याबाबत अपुरा पायाभूत आधार ही महत्त्वाची चिंता आहे. नागरिकांना सुरक्षित, सक्षम आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा ही मूलभूत गरज आहे.
३. पाणीटंचाई आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन – जेजुरीला पाण्याची समस्या ही नवीन नाही. शहराला पाणीपुरवठा करणारा मल्हार सागर धरण कोरडे पडले की शहराला पाणीपुरवठा चे बारा वाजतात. मंग वीर धरणावर अवलंबून राहावे लागते. काही भागात पाणीपुरवठा अनियमित आहे, टँकरवर अवलंबून राहावे लागते. भाविकांसाठी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची सुव्यवस्था नसल्याने त्रास वाढतो.
पाणी ही जीवनावश्यक गरज असून ती उपलब्ध होण्यासाठी नियोजनबद्ध योजना अंमलात आणणे हा काळाची गरज आहे.
४. पार्किंग आणि वाहतूक – भाविकांचे सर्वात मोठे दुखणे
जेजुरीला येणाऱ्या भाविकांसाठी पुरेसे पार्किंग नाही, वाहतूक कोंडी, मार्गदर्शक फलकांचा अभाव ,पादचारी आणि वाहनांचे असुरक्षित मार्ग या कारणांनी भाविक त्रस्त होतात. अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाल्याने नागरिकांनाही त्रास वाढतो. जेजुरीसारख्या धार्मिक पर्यटनस्थळी शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था ही अत्यंत आवश्यक आहे.
५. बाथरूम, स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधा – मोठी उणीव
भाविकांना वापरता येतील अशी स्वच्छ सार्वजनिक शौचालये,स्नानगृहे,बसण्याची ठिकाणे,विश्रांती शेड,माहिती केंद्र यांची कमतरता प्रकर्षाने जाणवते. सुविधा नसल्याने गावाची प्रतिमा खराब होते आणि भाविक नाराज होतात.
६. अतिक्रमण – रस्त्यांची दुरवस्था अधिकच गंभीर – गावातील अनेक भागांत अतिक्रमणामुळे,रस्ते अरुंद,सुरक्षेचा अभाव,आपत्कालीन वाहनेही सहज जात नाहीत,भाविकांना दिशामिळत नाही हे वास्तव आहे. अतिक्रमण हटवणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे तर नागरिकांचीही सामूहिक जबाबदारी आहे.
७. मोकाट जनावरे आणि कुत्र्यांची समस्या – रस्त्यांवर मोकाट जनावरे दिसणे, कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांना तसेच भाविकांना सतत भीती आणि त्रास सहन करावा लागतो. हे प्रश्न गंभीर असून ठोस उपाययोजना आवश्यक आहे.
८. शिक्षण आणि मुलांच्या भविष्यासाठी आवश्यक सुविधा – जेजुरीमध्ये काही शैक्षणिक संस्था असल्या तरी गुणवत्तापूर्ण शिक्षण,आधुनिक प्रयोगशाळा,खेळाची मैदाने,तंत्रज्ञानाधारित शिक्षण
यांची आवश्यकता जाणवते. भविष्यातील पिढीसाठी सशक्त शैक्षणिक वातावरण तयार करणे महत्त्वाचे आहे. वैद्यकीय, तंत्रनिकेतन यासारखी शासकीय महाविद्यालय होणे गरजेचे आहे.
९. नागरिकांची अपेक्षा – राजकारणापलीकडचा विकास
निवडणूक म्हणजे फक्त उमेदवारांची स्पर्धा नाही,ती नागरिकांच्या अपेक्षा आणि प्रश्नांचे प्रतिबिंब असते.जेजुरीचा विकास कोणाच्या पक्षनिष्ठेने नाही, तर पारदर्शी काम,जबाबदारी,सातत्यपूर्ण प्रयत्न
या गोष्टींनीच होऊ शकतो.
नागरिकांची अपेक्षा एकच —
“जेजुरीचा विकास सर्वांसाठी समान.
जाती–पक्ष–धर्म यापेक्षा गावाचा प्रश्न प्रथम.”
१०. बदलाची सुरुवात नागरिकांकडूनच
विकास हे केवळ प्रशासनाचे काम नाही. नागरिक, व्यापारी, संस्था, समाजघटक — सर्वांनी हातात हात घालून पुढे यावे लागते.
गावाच्या प्रगतीसाठी
स्वच्छता
वाहतूक शिस्त
अतिक्रमण टाळणे
पर्यटकांसाठी सहयोग
हे सर्वांचेच कर्तव्य आहे.
जेजुरी ही केवळ देवस्थानांची नगरी नाही; ती आपल्या सर्वांची ओळख आहे. गेली कित्येक वर्ष नगर परिषदेची सत्ता आलटली पालटली जात आहे. मात्र जेजुरी शहराच्या वाटेला निराशाच आली आहे.
आपल्या पुढील पिढ्यांना एक विकसित, स्वच्छ, सुरक्षित, सुसज्ज जेजुरी द्यायची असेल, तर आजच सजग नागरिक म्हणून सहभाग घेणे आवश्यक आहे. सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू असून नेते आश्वासनाची खैरात करत सुटले आहेत. मात्र त्या घोषणा किंवा आश्वासनाचं वास्तव काय याचा विचार सुद्धा नागरिकांनी करणे गरजेचे आहे. नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता सारासर विचार करून मतदान केल्यास एक उज्वल पिढी व सुंदर शहर तयार होण्यास हातभार लागेल. आपल्या भागाचा परिसराचा विकास झाला आहे का व तो कोण करू शकतो. याचा विचार करूनच योग्य त्या उमेदवारांना मतदान करण्याची आता वेळ आली आहे.



