वाहन अपघातात मृत्यू झालेल्या प्रशांत दातेच्या कुटुंबियांना कंपनीकडून आर्थिक मदत
वाहन अपघातात मृत्यू झालेल्या प्रशांत दातेच्या कुटुंबियांना कंपनीकडून आर्थिक मदत
मयुर कुदळे
जेजुरी प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील जेजुरी एमआयडीसी मधील भोरवाडी फाटा येथे झालेल्या एस टी आणि मोटर सायकलच्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या प्रशांत दाते(रा. सुकलवाडी) याच्या कुटुंबियांना रत्ना लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने आज आर्थिक मदत करण्यात आली.
रविवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी कामावर जात असताना भोरवाडी फाट्यानजीक एसटी बस आणि मोटर सायकलचा भीषण अपघात झाला होता. त्यामध्ये प्रशांत दाते याचा जागीच मृत्यू झाला होता तर त्याचा सहकारी मित्र तुषार भुजबळ (रा.वाल्हे) याला गंभीर दुखापत झाली होती .
अपघातामुळे दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. हे दोघेही जेजुरी येथील रत्ना लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीत काम करत होते. कंपनीच्या मालक आणि मॅनेजमेंट यांनी आज स्वतः प्रशांत च्या घरी जाऊन त्याच्या नातेवाईकांची सांत्वन भेट घेतली. यावेळी त्यांच्याकडून कुटुंबियांना सात लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी राहुल यादव, संदेश पवार, सागर भुजबळ तसेच वागदरवाडी गावच्या सरपंच उषा पवार सुकलवाडी गावचे मा उपसरपंच धनंजय पवार,नारायण पवार, प्रदीप चव्हाण ,रुपेश यादव , दिशांत कुभांरकर तसेच कै. प्रशांत दाते याचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
जखमी तूषारची पुणे येथे रुग्णालयात जाऊन भेट घेऊन तसेच त्यास 25 हजार रोख मदत देऊ केली असल्याचे आणि भविष्यातही त्यास शक्य तेवढी जास्तीची मदत करणार असल्याचे कंपनी मालक प्रकाशजी महाजन यांनी यावेळी सांगितले.कंपनी मॅनेजमेंट ने दाखवलेल्या संवेदनशीलतेबाबत संदेश पवार आणि राहुल यादव यांनी आभार मानले.